दिव्यता आणि दिव्यसेवा

प्रथम स्कंद- अध्याय दुसरा – दिव्यता आणि दिव्यसेवा

१-५ श्रील सुत गोस्वामी पहिले गुरूंना नमन करून ऋषींच्या प्रश्नांना उत्तर देण्यास सुरुवात करतात
६-१० धर्म ,अर्थ आणि काम दृष्टीकोणातून परम सत्य साक्षात्काराचे महत्व
११-२२ परम सत्य साक्षात्कार प्राप्त करण्याची पद्धत
२३-२९ ब्रह्मा ,विष्णू आणि शिवजी यांच्या तुलनेत “वासुदेव” उपासनेचे महत्व
३०-३४ ब्रह्मांड निर्मिती संबंधीच्या भगवंतांच्या लीलांचे वर्णन आणि भगवंतांचे विविध अवतार घेण्याचे मूळ कारण

विभाग १) १-५
रोमहर्षण पुत्र उग्रश्रवा (गोस्वामींची) ऋषींच्या प्रश्नांना उत्तर देतांना त्यांची मनोवृत्ती स्पष्ट करा ?(१)
• ते ब्राह्मणांच्या प्रश्नांनी प्रसन्ना झाले आणि त्यांना धन्यवाद देवून त्यांनी प्रश्नांची उत्तर देण्यास प्रयत्न केला.
रोमहर्षण पुत्र उग्रश्रवा (सुत गोस्वामी) ऋषींच्या प्रश्नांना उत्तर देतांना सुरुवात कशी करतात?(२-५)
• सुत गोस्वामी प्रथम त्यांच्या आध्यात्मिक गुरूंना (शुकदेव गोस्वामिंना )वंदन करतात आणि त्यांची कीर्ती अशा शब्दात सांगतात.
• जन्मतःच मुक्त जीव असल्यामुळे त्यांनी उपनयन संस्कार पार न पडताच संन्यास धारण केला.
• शुकदेव गोस्वामी सर्वांच्या हृदयात प्रवेश करू शकतात.
• ते सर्व साधूंचे आध्यात्मिक गुरु आहेत आणि व्यासदेवांचे पुत्र आहेत.
• त्यांनी पहिले स्वतः श्रीमद भागवताचे अध्ययन करून ते पूर्ण आत्मसात केले आणि आपल्या अनुभवांसहित तेच भागवतं सर्वांसमोर सांगितले.
• भौतिक जगातील अंधकारमय जीवन-शृंखलेतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करणाऱ्या बद्ध जीवांवर कृपा करणे, या एकमेव हेतूने त्यांनी भागवत कथन केले. (२-३)
• भागवतं कथनापुर्वीभगवान नारायण , नर-नारायण ऋषी , सरस्वतीदेवी, आणि श्रील व्यासदेव यांना प्रणाम करणे आवश्यक आहे.(४)
• सुत गोस्वामी ऋषींचे आभार मानतात कारण त्यांचे प्रश्न वाखाणण्यासारखे आहेत, आणि त्यात पुढीलप्रमाणे तीन विशिष्ट लक्षणे दिसतात. हे प्रश्न १) “कृष्ण संप्रश्नः”- म्हणजेच भगवान श्री कृष्णाशी संबंधित आहेत, २) म्हणून “लोक-मंगलम”- पूर्ण जगाच्या कल्याणार्थ आहेत ३) “येनात्मा सुप्रसीदती” सर्वांच्या आत्म्याचे पूर्णपणे समाधान करण्यास समर्थ आहेत. (५)

विभाग २) ६-१० (पहिल्या अध्यायातील प्रश्न १ आणि २ चे उत्तर :- भक्ती (६ ते २९)
अखिल मानव समाजासाठी कोणता परम धर्म आहे?
• अखिल मानव समाजाचा परम धर्म म्हणजे ( अधोक्षज ) श्रीकृष्णांची अहैतुकी आणि अप्रतीहता भक्ती करणे होय, ज्याने आत्मा प्रसन्न होतो. (६)
• कृष्णभक्ती केल्याने साधकाला त्वरित अहैतुकी ज्ञान आणि भौतिक जगाबद्दल वैराग्य प्राप्त होते. ज्ञान म्हणजे कृष्णाचे रूप, गुण, लीला इत्यादींबद्दल ज्ञान आणि अहैतुकी म्हणजे मुक्तीची इच्छा राहणार नाही.(७)

सर्वांच्या स्वभाव धर्माचे परम उद्देश काय असावा , ज्याशिवाय त्याचे सर्व श्रम निष्फळ ठरतील?
• वर्णाश्रमानुसार सर्व स्वभाव धर्म पालन करण्याचा परम उद्देश म्हणजे भगवंतांच्या कथा श्रवण करण्यास आसक्ती उत्पन्न करणे हा असावा. जर हे ध्येय प्राप्त होत नसेल तर वर्णाश्रम धर्म पालन करणे एक व्यर्थ श्रमच आहे. (८)
भागवतमनुसार धर्म,अर्थ आणि काम यांचा कसा संबंध असावा?
• धर्म पालन करण्याचा उद्देश मोक्ष प्राप्त करणे आहे( धर्मस्यही अपवर्गस्य ) , अर्थ प्राप्ती नाही. धर्माचे पालन अर्थ प्राप्ती हेतूने कधीही करू नये. आणि ज्याचे ध्येय मोक्ष आहे त्याने अर्थ-प्राप्तीचा उपयोग इंद्रिय तृप्तीच्या हेतूने करू नये. (९)
जीवनात अर्थाचा उपयोग कसा केला पाहिजे?
• जीवनाचे ध्येय इंद्रिय तृप्ती ठेवू नये. फक्त निरोगी जीवन आणि आत्मसंरक्षण यावर संतुलन ठेवणे आणि प्रत्येकाने आपल्या जीवन परम ध्येय , परम सत्याला जाणण्यासाठी खर्च करावे(जीवस्य तत्त्व-जीज्ञासा ).(१०)

विभाग ३) ११-२२
विद्वान अध्यात्मवादी तत्त्वज्ञ परम सत्याचे कसे वर्णन करतात?
• तत्त्वज्ञ परम सत्याला अद्वय तत्त्व म्हणतात आणि याच्या ब्रह्मण, परमात्मा आणि भगवान या तीन अवस्था आहेत. (११)
• ज्ञानी- ब्रह्मन साक्षात्कार – सत अवस्था ( शाश्वत अवस्था )
• योगी- परमात्मा साक्षात्कार– सत-चीत अवस्था (शाश्वत + पूर्ण ज्ञान)
• भक्त – भगवान साक्षात्कार– सत-चीत-आनंद अवस्था (शाश्वत + पूर्ण ज्ञान + पूर्ण आनंद )
• ज्ञान आणि वैराग्य यांचा उपयोग करून वेदांत श्रुतीतून श्रवण केल्यावर जर प्रामाणिक जिज्ञासू कृष्णाची प्रेमभक्ती करतो तेव्हा त्याला परम सत्याचा साक्षात्कार होतो. (१२)
मनुष्याच्या जीवनातील सर्वोच्च परिपूर्णत्व काय आहे?
• सर्व वर्ण आणि आश्रमातील मनुष्यांच्या जीवनातील सर्वोच्च परिपूर्णता म्हणजे –कृष्णाला संतुष्ट करणे होय ( संसिद्धीर हरीतोषणम)(१३)
• म्हणून सदैव एकाग्र चित्ताने श्रीकृष्ण जे सर्व भक्तांचे रक्षक आहेत, त्यांच्या कथा श्रवण ,कीर्तन, स्मरण, आणि पूजन करणे फक्त यावर प्रत्येकाचे लक्ष असावे. (१४)
• बुद्धिमान मनुष्य या श्रीकृष्ण स्मरण-रुपी तलवारीने आपल्या सर्व कर्मग्रंथी छेदुन टाकतात. म्हणून अशा कथांवर कोण प्रेम करणार नाही.(१५)
श्रीकृष्णांच्या श्रवणाबद्दल रुची कशी प्राप्त करता येईल?
• जे सर्व दोषातून मुक्त आहेत, अशा भक्तांची सेवा केल्याने (स्यान महत सेवया विप्रा), वासुदेव-कथा रुची प्राप्त करता येते.(१६) (श्रद्धा, साधू-संग,भजन क्रिया )
• जेव्हा आपल्यात कृष्ण कथा श्रवणाची गोडी निर्माण होते तेव्हा कृष्ण जे आपल्या हृदयात सदैव स्थित आहेत , स्वतः आपल्या हृदयातील अभद्र ( भौतिक इच्छा ) नष्ट करतात. (१७) (भजनक्रिया –अनर्थ –निवृत्ती )
• त्याचा परिणाम काय होतो? – निरंतर श्रवणाने आणि भक्तांची सेवा केल्याने हृदयातील सर्व अमंगल पूर्णपणे नष्ट होते. आणि कृष्ण-भक्ती दृढ होते. (१८) (अनर्थ निवृत्ती –निष्ठा )
• दृढ भक्तीचा परिणाम- प्रकृतीच्या रज आणि तम गुणाच्या प्रभावातून आपली मुक्तता होते. आपण सत्त्व गुणात स्थित होवून पूर्णपणे सुखी होतो.(१९) ( रुची – आसक्ती )
• भगवत भक्तीच्या संपर्काने व्यक्तीचे मन प्रसन्न होते, सर्व प्रकारच्या भौतिक संगातून मुक्त होते आणि भक्त भगवत तत्त्व विज्ञान तत्त्वतः जाणू शकतो.(२०) (भाव – प्रेम )
• भक्तीचा परिणाम :- भिद्यते ह्रदय ग्रंथीस :- हृदयातील अहंकाराची गाठ सुटते,
• छीद्यन्ते सर्व संशय :- सर्व संशय नष्ट होतात,
• क्षीयन्ते चास्य कर्माणि :- सर्व कर्मांची शृंखला नष्ट होते आणि
• दृष्ट एवात्मनिश्वरे :- त्यावेळी आत्मसाक्षात्कार अनुभव होतो.(२१)
• सनातन काळापासून सर्व अध्यात्मवादी अशाच प्रकारे श्रीकृष्णकथा श्रवण आणि कृष्णभक्तांची प्रेममयी सेवा करत आले आहेत. असा भक्तीभाव आत्म्याला कृतार्थ करतो. (२२)

विभाग ४ (२३-२९)
ब्रह्मा ,श्रीविष्णू आणि महेश यांमध्ये श्रीविष्णुंची उपासना आपल्याला उत्तम लाभ देवू शकते हे उदाहरण देवून स्पष्ट करा?
• केवळ भौतिक जगाच्या उत्पत्ती, पालन आणि संहारासाठी भगवान श्रीकृष्ण अप्रत्यक्ष रूपाने भौतिक प्रकृतीच्या सत्त्व,रज आणि तम गुणांशी संबंधित होतात आणि ब्रह्मा ,विष्णू आणि महेश अशी गुणात्मक रूपे स्वीकारतात. यातील सत्त्वगुण युक्त श्रीविष्णूपासून अखील प्राणीमात्र परम लाभ प्राप्त करू शकतात.(२३)
• उदा. लाकूड हे एक पृथ्वीचे एक परिवर्तीत रूप आहे.लाकडापेक्षा धूर श्रेष्ठ आहे आणि धुरापेक्षा अग्नी श्रेष्ठ आहे, कारण अग्नीचा उपयोग वेदिक यज्ञ करून श्रेष्ठ ज्ञान प्राप्त करण्यात होवू शकतो. त्याच प्रमाणे तमोगुणापेक्षा रजोगुण श्रेष्ठ आहे पण सत्त्वगुण उत्तम आहे कारण सत्त्वगुणामुळे परम-सत्य जाणणे शक्य होते.(२४)
• प्राचीन काळापासून सर्व महर्षी प्राकृत भौतिक बंधनातून मुक्त होण्याकरिता कृष्णाची आराधना करत आहेत.(२५)
मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्या भक्ताचा इतर देवतांप्रती व्यवहार कसा असतो?
• मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा असणारे १) निश्चितच निर्मत्सरी असतात आणि सर्व देवतांचा आदर करतात. २) पण ते त्यांच्यावर आकर्षित होत नाहीत ३) सर्व आनंदमय भगवान श्रीविष्णू यांच्या रूपांची आणि त्यांच्या अंशांची उपासना करतात.(२६)
पितरांची, इतर जीवांची आणि विविध ग्रहातील देवतांची उपासना कोण करतात? आणि का?
• धन , शक्ती आणि संतान अशा भौतिक लाभाकरिता रजोगुणी आणि तमोगुणी लोक पितरांची, इतर जीवांची आणि विविध ग्रहातील देवतांची उपासना करतात.(२७)
सुत गोस्वामी हे कसे सिद्ध करतात की श्रीकृष्ण फक्त हेच एकमेव उपासनेसाठी योग्य आहेत?
• पहिले इतरांच्या उपासनेच्या तुलनेत श्री कृष्ण उपासना कशी उत्तम आहे हे सांगून (२३-२७)
• नंतर (२८-२९),शास्त्रीय ज्ञानाचा अंतिम उद्देश श्रीकृष्ण आहे (वेदेश्च सर्वेर अहं एवं वेद्यः), सर्व यज्ञहेतू कृष्णांना प्रसन्न करणे होय, योग साधने श्रीविष्णूंच्या साक्षात्कारासाठी आहेत, सर्व कर्मांची फळे श्रीविष्णूंच्या हस्तेच प्राप्त होतात, श्रीविष्णूंच्या परम ज्ञान आहेत, सर्व कठोर तपस्चर्या श्रीविष्णूंना जाणण्यासाठीच आहेत, श्रीविष्णूंची प्रेममय सेवा करणे हाच धर्म आहे, आणि श्रीविष्णूच जीवनाचे परम ध्येय आहे.

विभाग ५ (३०-३४)
निर्मिती संबंधी भगवंतांची भूमिका स्पष्ट करा?
• आपल्या अंतरंग शक्तीने भगवंत कार्य आणि कारण या दोन शक्तीची निर्मिती करतात. (कारणोदक शायी विष्णूंचे कार्य ) (३०)
• भौतिक द्रव्यांची उत्पत्ती केल्यानंतर वासुदेव स्वतःचा विस्तार करून प्रत्येक ब्रह्मांडात आणि प्रत्येक अणूत प्रवेश करतात. ते जीवांसारखेच दिसत असले तरी ते सदैव आपल्या दिव्य स्थितीत पूर्णपणे प्रकाशमान असतात. ( गर्भोदकशायी) (३१)
• लाकडात ज्याप्रमाणे अग्नी असतो तसेच कृष्ण परमात्मा (क्षीरोदकशायी विष्णू) रूपाने सर्वत्र व्याप्त आहेत. असे विभक्त झाल्यावरही ते अविभक्तच राहतात.(३२)
• कृष्ण जीवांमध्येही प्रवेश करतात आणि त्या सर्व जीवांना त्यांच्या सूक्ष्म मनाद्वारे तीन गुणांचे परिणाम भोगण्यास मदत करतात.(३३) (पहिल्या अध्यायातील प्रश्न ४ चे उत्तर )
भगवंत विविध अवतार धारण करण्यामागे काय हेतू असतो ?
• याप्रमाणे विश्वाचे स्वामी श्रीकृष्ण विविध अवतार धारण करून देवता, मनुष्य आणि अन्य सर्व जीवांचे वास्तव्य असलेल्या सर्व ग्रहलोकांचे पालन पोषण करतात. भगवंतांनी भौतिक जगात अवतरीत होण्याचा मुळ हेतू सत्त्व गुणातील व्यक्तींचा उद्धार करणे असतो. (३४) ( पहिल्या अध्यायातील प्रश्न ३ चे उत्तर )