गीता अध्याय ३ कर्मयोग

अध्याय ३ कर्मयोग
३.१ -२ संन्यासं कि कर्म
३.३-९ निष्काम कर्म योग
३.१०-१६ कर्म कांड ते कर्म योग
३.१७-३५ उदाहरण निर्माण करण्यासाठी निष्काम कर्म योग कसा करणे
३.३६-४३ काम आणि क्रोध यापासून सावध कसे राहणे

योग शिडी ( खालून वर)
फक्त कृष्ण प्रसन्न होतील ते कार्य करणे प्रेम भक्ती/ भाव भक्ती
वैयक्तिक स्वार्थ बाजूला सारून भक्ती करणे -निष्काम कर्म योग
भौतिक इच्छा बाळगून भक्ती करणे -सकाम कर्म योग
नियमित इंद्रिय तृप्ती -कर्मकांड (वेदांवर आधारित कर्म)
विना निर्बंध इंद्रिय तृप्ती – जनावरासारखे जीवन

१) सांख्ययोग आणि बुद्धीयोग यांमधील फरक स्पष्ट करा?
:- सांख्य योग आणि बुद्धी योग हे परास्वरांवर अवलंबून आहेत, जसे धर्म आणि तत्त्वज्ञान हे एकमेकांवर अवलंबून आहेत. ज्ञानाशिवाय धर्मकार्य केल्याने त्याची गणना भौतिक कार्यात होईल आणि फक्त तत्त्वज्ञान एकत्र करून त्यावर कार्य न केल्यास त्या ज्ञानाचा काहीही फायदा होणार नाही.
सांख्य योग:- व्याख्या :- आत्मा व प्रकृतीचे स्वरूप यांचा पृथक्कार्णात्मक अभ्यास करणे.अप्रत्यक्ष्य पद्धत , यशाची शाश्वती नाही , स्वतःच्या इंद्रिय संयमावर शुद्धीकरण अवलंबून असत, या पद्धतीत सुरवातीला मन आणि इंद्रिय काही प्रमाणात शुद्ध असण्याची आवश्यकता असते, या युगात हि पद्धत अव्यवहारिक आहे कारण आत्मा हा स्वाभाविकच सदैव कार्यशील असतो.
बुद्धियोग:-कृष्ण भावनाभावीत कर्म, प्रत्यक्ष पद्धत , यश नक्की आहे २.३९,२.४०, कारण भगवंत आणि भक्त दोन्हीही आपल्याला मदत करतात, साधना आणि साध्य दोन्हीही एकच आहे, या युगात हि सगळ्यात व्यावहारिक पद्धत.

२) ‘मिथ्थचारी’ कोणाला म्हणता येईल? :-
मिथ्याचारी हा असा व्यक्ती आहे कि जो आपली इंद्रीये संयमित करतो पण त्याचे मन मात्र विषय वस्तूंवर आकर्षित होत असत. उदा. हिरण्यकश्यप.

३) यज्ञाचा अर्थ काय? यज्ञ का करावे?भक्त श्रीकृष्णांना अन्न का अर्पण करतात?
• “ यज्ञ वै विष्णू ” यज्ञाचा उद्देश म्हणजेफक्त श्रीविष्णूंना प्रसन्न करणे होय. यज्ञ म्हणजेच विष्णू.
• इतर सर्व कार्यांनी आपण या भौतिक जगात बद्ध होत असतो. केवळ श्रीविष्णू यांच्याकरता आपण आपली सर्व कार्ये केली तरच आपण या कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो.
• उदाहरणार्थअन्न विष्णूंना अर्पण केल्याने ते शुद्ध होत आणि ते कमावतांना आपल्या हातून जे काही पाप घडल असेल तर त्या पापकृत्याचा, या यज्ञामुळे नाश होतो.
• ज्याप्रकारे एखाद्या महामारीत मानव समाजात बरेच जण रोगरायीत मारले जातात तेव्हा एखादा जंतुनाशक ह्या रोगावर मात करू शकतो, तसेच आपण कृष्ण प्रसाद ग्रहण केल्याने,
• आपल्या भौतिक जगावर स्वामित्व गाजवण्याच्या रोगावर प्रतिबंध लागतो आणि
• आपली भोग इच्छा हळू हळू नष्ट पावते.

४) पृथ्वीवरील जीवन पावसावर कशाप्रकारे अवलंबून आहे?
:- प्रत्येक जीव हा अन्न धान्यावर जगतो, हे धान्य पावसावर अवलम्बून असत. पाऊस हा यज्ञावर अवलंबून असतो आणि सर्व यज्ञ कर्म विहित कर्मामध्ये सांगितले आहेत. विहित कर्म वेदांमध्ये सांगितले आहेत आणि वेद हे भगवंतापासून उत्पन्न झाले आहे. म्हणून जेव्हा हे सर्व अन्न आपण भगवंताना अर्पण करतो तेव्हा ते कमावतांना जे काही आपल्या हातून पापकर्म घडले असतील ती सर्व नष्ट होतात.

५) श्रीकृष्णांना मानवीनियमांचे पालन का करतात?
• सर्व साधारण व्यक्तीला योग्य मार्गदर्शन मिळाव म्हणून आपले मानवरुपी विहित कर्म करतात.
• मानवाला गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः कर्म करावे लागतात.
• भगवंताकडे असणाऱ्या अगणित शक्तीस्वरूप सेविका अशाप्रकारे कार्यरत आहेत कि भगवंतांना लागणाऱ्या सर्व गोष्टी आपोआप घडवल्या जातात. म्हणून त्यांना कुठलेच कार्य स्वतः करायची गरज नाही.
• भगवंतांना कुठलीही भौतिक गरज आणि इच्छा नाही. म्हणून जर भगवंतांनी काही कर्म केले नाही तर सर्वसामान्य व्यक्ती जे श्रेष्ठ व्यक्तीचे अनुकरण करत असतात,ते त्यांचे अनुकरण करतील आणि समाजात वर्णसंकर निर्माण होईल. त्याला भगवंत कारणीभूत ठरतील. सर्व जीव शांतीत आपले विहीत कर्म करायला प्रवृत्त होण्यासाठी “आत्म-रत” व्यक्ती आणि भगवंत गरज नसतांनाही विहित कर्म करतात.

६) ‘अनुसरण’ आणि ‘अनुकरण’ या कृतींमधील फरक स्पष्ट करा?
• अनुकरण करणे म्हणजे व्यक्तीची श्रेष्ठता न जाणता फक्त त्याच्या बाह्य कार्याची नक्कल करणे. ते का करावे किंवा ते करायची आपली पात्रता आहे का? आपली ऐपत आहे का? हे न जाणता फक्त त्यांची नक्कल करणे, “ त्यांनी केले म्हणून मी पण करेन हा त्यांचा हट्ट असतो.” याला अनुकरण करणे म्हणतात.
• उदा. १) श्रीकृष्णांनी रास लीला केली पणत्याचबरोबर गोवर्धन पर्वतही उचलला २) शिवजिंच्या अनुयायांना त्यांच्या नावावर गांजा प्यायला आवडतो पण त्यांच्यासारखे विष पिण्याची त्यांच्यात हिम्मत नाही. म्हणून फक्त एकच लीला बघून श्रेष्ठ व्यक्तीचे अनुकरण करू नये.
• श्रेष्ठ व्यक्तींचे अनुकरण न करता त्यांची शिकवण आत्मसात करायला हवी, त्यांचे उपदेश पालन करावे. त्याला म्हणतात अनुसरण. अनुसरण केल्याने आपली आध्यात्मिक प्रगती होते.

७) कर्मफलांमध्ये आसक्त असणार्‍या व्यक्तींप्रती कृष्णभावनाभवित व्यक्तीचे आचरण कसे असावे?
• जो व्यक्ती भौतिक कर्म कांडाची व्यर्थता जाणतो त्याने इतर भौतिकवादी लोकांना कर्म त्याग करण्यास प्रवृत्त करू नये.
• उलट अशा व्यक्तीस भगवंतांच्या सर्व सेवा करण्यास मार्गदर्शन केले पाहिजे.
• आणि कर्मफळाचा थोडा भाग भगवंतांच्या सेवेत करण्यास प्रोत्साहित करणे.
• असे केल्याने त्या व्यक्तीचे हळू हळू ह्रदय शुद्धीकरण चालू होइल आणि अशा प्रकारे ज्ञान प्राप्तकेल्यामुळे तो स्वतःहून खऱ्या आत्मसाक्षात्कारास सुरुवात करेल. म्हणून
• अनासक्त व्यक्तीने आसक्त व्यक्तीला १) निराश करू नये. २) कर्म त्याग करण्यास प्रवृत्त करू नये ३) आणि सर्व प्रकारच्या कृष्ण भावनाभावीत सेवेत संलग्न करावे.

८) भगवंतांच्या उपदेशांचे ‘द्वेषरहित ‘ आणि ‘द्वेषभावनेत ‘ पालन केले तर काय होते?
• जो भगवंतांच्या सर्व आदेशांचे पालन कुठल्याही प्रकारचा द्वेष न बाळगता, पूर्ण श्रद्धेनुसार आणि काटेकोरपणे करतो, तो सर्व कर्म बंधनातून मुक्त होतो.
• पण जो व्यक्ती द्वेषामुळे भगवंतांच्या आदेशांचे पालन करत नाही, तो मूर्ख म्हणून जाणला जातो आणि श्रेष्ठत्व मिळवण्याचे त्याचे सर्व प्रयत्न धुळीस मिळतात.

९) मनुष्याने इतरांच्या कर्मांचे अनुसरण करण्यापेक्षास्वतःच्या नियत कर्मांकडे का लक्ष द्यावे?
• दुसऱ्या व्यक्तींच्या कार्याचे कोणीही अनुकरण करू नये. हे फार घातक आहे. आपले विहित कर्म जरी शोभनीय नसेल तरी आपण दुसऱ्याचे कर्म स्वीकारू नये. आपल्याला कितीही वाटेल की दुसऱ्याचे कर्म मी खूप चांगल्याप्रकारे करू शकतो तरी शास्त्र त्याला मान्यता देत नाही. आपले विहित कर्म करतांना आपला नाश झाला तरी ते दुसऱ्याचे कार्य करण्यापेक्षा कित्येक पटीने श्रेष्ठ आहे.
• कारण दुसऱ्याचा मार्ग पकडणे धोकादायक असते. १) असे केल्यास आपण भविष्यात फक्त असे कर्म स्वीकारू जे आपल्या इंद्रियांना सुखकारक आहेत(त्रासदायक कर्म नको). २) दुसऱ्याचे कर्म केल्याने सामाजिक ऐक्य भंग होण्यास तुम्ही कारणीभूत ठरता. नियत कर्म हे फक्त वैयक्तिक शुद्धीकरणासाठी नेमलेले नसून, ते पूर्ण समाज स्थिर राहण्यासही मदत करतात. जर एखादा व्यक्ती दुसऱ्याचे कार्य स्वीकारण्याचा विचार करत असेल तर त्याच्यावर अवलंबून असणारे सर्वजण सदैव धोक्यात राहतील.३) दुसऱ्याचा मार्ग पकडणे हे आपल्याला वाटत तितक ते सोप नाही. आपल्या नैसर्गिक प्रवृत्ती ह्रदयात खूप खोलवर दडलेल्या आहेत. म्हणून आपले विहित कर्म सोडणे एवढे सोपे नाही.
• अस्वाभाविक कर्म केल्याने थोड्याच कालावधीत आपल्याला निराशा जाणवेल आणि ती आपल्या पतनास कारणीभूत ठरेल.

१०) काम याविषयावर र्निबंध लिहा ?
• ज्यावेळी जीव हा भौतिक जगाच्या संपर्कात येतो तेव्हा त्याचे कृष्णाबद्दलचे शाश्वत प्रेम, हे रजो गुणामुळे कामात रुपांतरीत होते. उदा. दुधाचा संपर्क चिंचेसारख्या आंबट पदार्थाशी झाल्यास त्याचे दह्यात रुपांतर होते.
• काम हा बद्ध जीवाला तीन प्रकारच्या आवरणाने झाकतो उदाहरणार्थ :- १) अग्नी धुराने झाकला जातो – आपण ही अवस्था मनुष्याची आहे असे समजू शकतो. २) आरसा धुळीने झाकला जातो:- हि पक्षी आणि प्राण्यांची अवस्था आहे. ३) गर्भ हा गर्भाशयाने झाकला जातो:- हि वृक्षांची अवस्था आहे.
• त्याची उपस्थिती ही इंद्रिय, मन आणि बुद्धी या ठिकाणी असते. इथे राहून तो जीवावर हल्ले करत असतो.
• नियमित तत्त्वांचे पालन करून आपण इंद्रिय संयम राखू शकतो. कर्मेंद्रिये जड वस्तू पेक्षा श्रेष्ठ आहेत. मन हे इंद्रीयान्पेक्षाही श्रेष्ठ आहे.बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे.आत्मा हा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे.
• अशाप्रकारे आत्मा हा भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धीपेक्षा बलशाली आहे हे जाणून आध्यात्मिक शक्तीने कामावर मात केली पाहिजे.
पुढील व्याख्या द्या?
• तत्व-वीत :- असा व्यक्ती जो परम सत्य हे तीन नीरनिराळ्या रुपामध्ये अस्तित्वात आहे हे जाणतो आणि हेही जाणतो कि जीवाचा त्या मूळ परम सत्याशी शाश्वत सेवक-स्वामी असा संबंध आहे. तो सदैव कृष्ण भावनाभावीत कार्यात मग्न असतो आणि भौतिक इंद्रीयतृप्तीपासून निसर्गतःच ( आपोआपच ) अनासक्त होतो.
• मंद :- म्हणजे जो देहात्माबुद्धीशी आसक्त असतो. त्याला आत्म्याबद्दल काहीच ज्ञान नसते. त्याचे कार्य म्हणजे आपले सगेसंबंधी त्याला सगळ्यात प्रिय असतात, त्याला त्याची जन्मभूमी पूजनीय असते, आणि तो “ धार्मिक कार्यांची पद्धत काटेकोरपणे पाळणे” हेच अतिम ध्येय समजतो. त्या कार्यांनी आपली आध्यात्मिक प्रगती होणार आहे का? ह्याच्याशी त्याला काही घेण देण नसत. सामाजिक कार्ये, देशप्रेमी कार्ये, जनकल्याणासाठी निस्वार्थ सेवा करणे यातच तो मग्न असतो.
• अध्यात्म-चेतस:- म्हणजे पूर्णपणे कृष्ण भावनाभावीत व्यक्ती, जो स्वतःचा सर्व स्वार्थ बाजूला सारून पूर्णतः भगवंतांवर अवलंबून असतो.
• निराशी :- स्वतःसाठी कुठल्याही फळाची अपेक्षा न करता जो भगवंतांच्या सर्व आदेशांचे पालन करतो. उदा. बँकेत काम करणारा accountant रोज कीतीही पैसे मोजत असेल तरी तो त्या पैस्या पासून अनासक्त असतो.
• विगत-ज्वर:- म्हणजे आळस नसणे, तो समोर सगेसंबंधी असतील तरी त्यांच्याशी युद्ध करण्यास नाखूष नसतो.