ज्ञानविज्ञान योग

अध्याय सात ज्ञानविज्ञान योग
६.४७ भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे जो योगी सतत भगवंतांवर मनन करत असतो तो सर्वात उत्तम असतो. या अध्यायात हे मनन कस कराव ह्याची चर्चा केली आहे.
कोणावरही श्रद्धा पूर्वक चिंतन करण्यासाठी त्या व्यक्तीबद्दल ज्ञान असणे फार आवश्यक आहे. व्यक्तीबद्दल असणाऱ्या ज्ञानाने त्याच्याबद्दल श्रद्धा उत्पन्न होते. त्या ज्ञानाच्या अभावी कोणालाही भगवंतांच्या वास्तविक स्थितीबद्दल शंका निर्माण होवू शकते. म्ह्नणून भगवंत ७ ते १२ अध्यायात स्वतःबद्दलचे ज्ञान सांगतात जेणेकरून भक्तांना भक्तीत प्रेरणा मिळावी आणि त्यांची भक्ती प्रबळ बनेल.
ज्ञान प्राप्त करण्याचे दोन पंथ आहेत आरोह आणि अवरोह. आरोह म्हणजे स्वतःच्या बुद्धिमत्तेने आणि प्रयत्नाने आध्यात्मिक प्रगती करणे आणि अवरोह म्हणजे अधिकारी व्यक्तीकडून ज्ञान प्राप्त करणे. भगवंत पहिल्या श्लोकात अवरोह पंथाने श्रवण करूनच ज्ञान प्राप्त करणे ह्यावर भर देतात की केवळ हाच मार्ग आहे भक्तीत प्रगती करण्याचा.
विभाग १-३:- फक्त श्रवण करा कशाचे :-
कृष्णाच्या भौतिक आणि अध्यात्मिक शक्तीबद्दल श्रवण करा. अशाप्रकारे श्रवण करून भगवंतांना तत्त्वतः जाणणारा भक्त हा खूप दुर्मिळ आहे.
विभाग ४-१२ :-कृष्णाच्या भौतिक आणि आध्यात्मिक शक्ती.
जड आणि जीवित दोन्ही वस्तूंचे उगम स्थान कृष्ण आहे. सृष्टीत सर्व काही तीन गुणांच्या अधीन आहे. भगवंत सर्व सृष्टीत उपस्थित असूनही तीन गुणांपासून सदैव अलिप्त असतात.
विभाग १३-१४:- कृष्ण तीन गुणांचे नियंत्रक आहेत म्हणून त्यांना शरण या.
विभाग १५-१९ :- पुण्यवान शरण येतात आणि पापी लोक शरण येत नाही
विभाग २०-२५:- देवतांची आराधना आणि अद्वैतवाद
विभाग २६-३०:- माया जीवांना गोंधळून टाकते आणि फक्त कृष्णाला जाणल्याने जीव मुक्त होवू शकतो.

विभाग १-३
१ सतत कृष्ण चिंतन करण्यासाठी त्यांच्या उत्तम स्थिती बद्दल श्रवण करणे खूप आवश्यक आहे. कृष्णाला पूर्णपणे जाणण्यासाठी मन एकाग्र करून, भक्तियुक्त होवून त्याच्या बद्दल श्रवण केले पाहिजे. नवविधा भक्तीमध्ये सुरुवातीला श्रवणच करायला सांगितले आहे.
श्रवण क्रिया कशाप्रकारे ह्रदय शुद्धीकरण करते? भागवतं १.२.१७-२१
कृष्ण कथा श्रवण करणे हे सर्वात उत्तम पुण्य कर्म आहे. जेव्हा भक्त भगवंतांच्या कथा ऐकण्यास उत्सुकता आणि धृडता दाखवितो, तेव्हा भगवंत जे सर्वांच्या ह्रदयात परमात्मा रुपात स्थित आहेत, ते स्वतः अशा भक्ताचे हृदय शुद्ध करतात. नियमित भागवत कथा श्रवण केल्याने हृदयातील सर्व अभद्र इच्छांचा पूर्णपणे नाश होतो, आणि सर्वांच्या ह्रदयात सुप्त अवस्थेत असणाऱ्या ज्ञानाचा साहजिकच विकास होतो. भक्त जितके जास्त श्रवण करतो तितकी जास्त त्याची भक्तीवरील निष्ठा दृढ होते आणि सतत भक्तिमय सेवा करण्याची त्याच्या ह्रदयात इच्छा जागृत होते. जेव्हा अशी निरंतर भक्तिमय सेवा भक्ताच्या हृदयात प्रस्थापित होते तेव्हा त्याच्यावरचा रजो आणि तम गुणांचा प्रभाव नाहीसा होतो, आणि यामुळेच काम आणि लोभ इत्यादींचा क्षय होतो. जेव्हा या विकृती नष्ट होतात तेव्हा भक्त आपल्या विशुद्ध सत्त्वावस्थेत स्थित होतो. भक्तीमुळे तो प्रसन्न होतो आणि भगवत-तत्त्व विज्ञानाचे त्याला पूर्णपणे ज्ञान होते. याप्रमाणे भक्ती योगामुळे ह्रदयातील भौतिक आसक्तीरूपी कठीण गाठ भेदली जाते आणि जीव परम सत्य पुरुषोत्तम भगवंताना जाणण्याच्या स्थराप्रत उन्नत होतो.
२ संपूर्ण ज्ञान म्हणजे जड वस्तू, आत्मा आणि दोघांच्या निर्मात्याला जाणणे.
३ दुर्मिळ ज्ञान :- हजारो हजारो जिवांपैकी एखादा जीव मनुष्य जीवनाचे ध्येय प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, आणि हे ध्येय प्राप्त केलेल्या हजारो जिवांपैकी फक्त एखादा जीव कृष्णाला पूर्णपणे तत्त्वतः जाणू शकतो.
भक्ती ही सोपी आहे कारण त्यासाठी काहीच पात्रता लागत नाही आणि ती फार कठीणही आहे कारण फक्त निस्वार्थ भक्तांनाच भगवंत प्राप्त होतात. सामान्यतः मानवप्राणी हा आहार , निद्रा, भय आणि मैथुन यातच गुंतला असतो म्हणून अध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणालाच उत्सुकता नसते. जरी त्याने प्रयत्न चालू केला तर ज्ञान योग, ध्यानयोग ,कर्मयोग यांच्या पुढे त्यांची गाडी पुढे येतच नाही.
विभाग ४-१२
प्रकृती ७.४ , जीव ७.५ , आणि ईश्वर ७.६-७
४ परम सत्याच्या तीन अवस्थांपैकी पुरुषोत्तम भगवान श्रेष्ठ कसे आहे? वैकुंठ लोकामध्ये जी अध्यात्मिक विविधता आहे ती ब्रह्मज्योतिमध्ये नसते आणि निर्विशेश्वादी लोक ब्रह्मज्योतीला अंतिम मानतात.सर्व ब्रह्मांडात क्षीरोदक-शायी विष्णुरूपी सर्वव्यापी परमात्मा रूपही नित्य नाही. भगवतधामात परमात्मा रुपाची आवश्यकताच नाही कारण भगवंत स्वतःच आपल्यासमोर असतात. म्हणून वास्तविक परम सत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत.
भौतिक शक्तीला प्रकृती असे म्हणतात. प्राकृत सृष्टीच्या निर्मितीकरिता भगवान श्रीकृष्णाचे विस्तारित रूप तीन विष्णूरूपे धारण करतात. या तीन अवतारांना पुरुषावतार म्हणतात. पहिले महा-विष्णू रूप महत-तत्त्व नावाच्या संपूर्ण भौतिक शक्तीची निर्मिती करतात. दुसरे गर्भोदक-शायी विष्णू हे रूप प्रत्येक ब्रह्मांडामध्ये वैविध्यपूर्ण निर्मिती करण्यासाठी प्रवेश करतात. आणि तिसरे रूप क्षीरोदक-शायी विष्णू सर्व ब्रह्मांडा मध्ये सर्व व्यापी परमात्मा म्हणून प्रत्येक अणूमध्ये प्रवेश करतात. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ,मन बुद्धी, आणि अहंकार या आठ भगवंतांच्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत.या आठ शक्तीद्वारे भौतिक जगाची चोवीस तत्त्वे अभिव्यक्त होतात. शब्द ,स्पर्श, रूप, रस आणि गंध ही पाच इंद्रिय विषये, पाच ज्ञानेंद्रिये ( डोळे, कान, जीभ, नाक, त्वचा ), पाच कर्मेंद्रिये ( हात, पाय, जीभ, शिश्न द्वार, गुद्वार ) आणि अप्रकट गुण.
५. सर्व जीवांचा उल्लेख हा अपरा प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ असा परा प्रकृती म्हणून केला आहे, जे ह्या कनिष्ठ अपरा प्रकृतीचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जीवाशिवाय भौतिक सृष्टी कार्यरत होवू शकत नाही तरीही हे जीव स्वतंत्र नसून सतत भगवंतांच्या नियंत्रणाखाली असतात. गुणात्मक दृष्ट्या हे भगवंतासारखेच असले तरी परिमाणात्मकदृष्ट्या ते त्यांची कधीच बरोबरी करू शकत नाही.त्यांची गणना तटस्थ शक्तीत होते जे कधीही मायेच्या किंवा कृष्णाच्या प्रभावाखाली येवू शकतात.
६ आणि ७ श्रीकृष्ण हे जड वस्तू आणि जीव या दोघांपेक्षा श्रेष्ठ आहेत.
श्रीकृष्ण जगाच्या उत्पत्तीचे आणि प्रलयाचे कारण आहेत.
सर्व काही त्याच्या वर अवलंबून आहे तरीही त्यांना कोणीही पाहू शकत नाही ज्याप्रमाणे आभूषणातील माळेचे सर्व मणी दोऱ्यावर ओवले असतात आणि त्यावर टिकून असतात पण तरीही दोरा आपणास दिसत नाही. कधी लोक प्रश्न विचारतात की बऱ्याचवेळी कर्मी लोक भक्तांपेक्षा जास्त सभ्य वागतात, असे का? नैतिक व्यवहाराबद्दल बघितलं तर बरेचदा कर्मी लोक खूप सोज्वळ पणे वागतात. म्हणजे त्यांच्या कडे जे गुण आहेत ज्यांना आपण मणी म्हणू शकतो. पण त्यांच्या जवळ हे मणी शाबूत ठेवण्यास धागा किवा दोरा नाही आहे. कृष्ण म्हणजे ह्या गुणांना एकत्र ठेवणारा दोरा आहे. भक्तांकडे कर्मिंच्या तुलनेत कधी कधी थोडेफार कमी गुण आढळतील पण त्यांच्याकडे कृष्ण असल्याकारणाने जेही गुण त्यांच्यात आहेत ते सर्व गुण टिकून राहतात. कठीण परिस्थितीत कर्मी लोक आपल्या चांगल्या गुणाप्रमाणे वागु शकत नाही. भक्त मात्र ह्रदय शुद्ध करताना इतर गुण प्राप्त करत असतात. उदा यस्यास्ती भक्तीर भगवती अकिंचने सर्वेर गुणेर तत्र समास्ती सुराः हराव अभक्तस्य कुतो महत गुणः मनो रथेनास्ती धावतो बहिह .
श्रीकृष्णा व्यतिरिक्त दुसरे कुठलेही श्रेष्ठ तत्त्व नाही.
ज्याप्रमाणे आत्म्याच्या उपस्थितीतच शरीर लहानाचे मोठे होते तसेच हे जगही परमात्याच्या उपस्थितीमुळेच कार्यरत असते.
“ नियो नित्यानाम चेतानास चेतानानाम एको बहूनां हि विदधाती कामान”
सर्व शाश्वत जिवांपैकी कृष्ण हे परम शाश्वत आहेत जे सर्वांचे पालनपोषण करत आहेत. भौतिक जगाचा विकास होण्याकरिता जड वस्तूला चेतन शक्तीची आवश्यकता असते. लहान मुल बालपणापासून तारुण्यावस्थेत प्रवेश करण्याचे कारण त्यात जीवात्मा उपस्थित असतो. त्याचप्रमाणे संपूर्ण सृष्टीचा विकास परमात्मा श्रीविष्णुंमुळे होतो. “ परास्य शक्तीर विविधेय सूयते स्वाभाविकी ज्ञान बले क्रिया च ” म्हणजे भगवंतांना स्वतःहून काही करण्याची गरज नसते तर त्यांच्या असंख्य शक्ती त्यांच्यासाठी सदैव कार्यरत असतात. आपल्याला काही करायची इच्छा झाली तर पहिले ते कसे करणार, साधन,भांडवल,मदतीला कोण येणार इत्यादी गोष्टींवर सर्व अवलंबून असत. पण भगवंतानी फक्त इच्छा केली की त्यांच्या असंख्य शक्ती हजार होतात आणि अपोआप कार्य होते.
जड आणि चेतन या दोन्ही मूळतः भगवंतांच्या शक्ती आहेत. म्हणून भगवंत हे सर्व गोष्टींचे मूळ कारण आहेत.
८-११ या प्रकृतीतही सर्व वस्तूंचे कारण श्रीकृष्णच आहेत.
आपल्या परा आणि अपरा शक्तींद्वारे भगवंत सर्व व्यापी आहेत. ज्याप्रमाणे सूर्य किरणांद्वारे आपणास सूर्य सर्वव्यापी असल्याची जाणीव होते त्याचप्रमाणे भगवंतांच्या विविध शक्तींद्वारे त्यांच्या सर्वव्यापी रुपाची अनुभूती आपल्याला होवू शकते.
मायावादी लोक नेहमी विचारतात कुठे आहे तुमचा देव तर भगवंत इथे सांगतात आहे की रोज सभोवताली छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही माझा अनुभव करू शकता.
१) पाण्याची चव
२) चंद्र आणि सूर्याचा प्रकाश
३) वेदिक मंत्रातील ओंकार
४) आकाशातील ध्वनी
५) मानवातील सामर्थ्य
६) पृथ्वीचा सुगंध
७) अग्नीतील उष्णता
८) सर्व जिवांमधील जीवन शक्ती
९) तपस्वींचे तप
१०) अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज
११) बुद्धीमानांची बुद्धी
१२) शक्तीमानांची शक्ती
१३) बलवानांचे बल
१४) धर्मतत्वाविरुद्ध नसणारा काम

१२ भौतिक जगातील सर्व प्राकृतिक क्रिया , तीन गुणांच्या प्रभावाखाली पार पडली जातात. कृष्ण तीन गुणांचे उगम स्थान असले तरीही ते निर्गुण आहेत म्हणजे ते त्यांच्या पलीकडे आहेत. उदा. राष्ट्राच्या कायद्यानुसार मनुष्याला शिक्षा होऊ शकते परंतु कायदा बनवणारा राजा कायद्यांच्या अधीन नसतो, त्याचप्रमाणे भौतिक प्रकृतीचे सत्त्व, राज,आणि तम हे तिन्ही गुण श्री कृष्णांपासून निर्माण झाले असूनही भगवंत स्वतः निर्गुण आहेत म्हणजे या तीन गुणांचा त्यांच्यावर कधीही काहीच परिणाम होत नाही.
विभाग १३-१४
१३ त्रिगुणात्मक प्रकृती ही श्रीकृष्णाची शक्ती आहे जी सर्व जीवांना मोहित करते. तिच्या तावडीतून सुटका करण्यासाठी आपल्याला श्रीकृष्णाचा आश्रय घेणे हा एकच मार्ग आहे. आपली कितपत सुटका होईल हे आपल्या शरणागतीवर अवलंबून आहे.
१४ दोरखंडाने बद्ध असलेल्या व्यक्तीने कितीही प्रयत्न केले तरी तो स्वतः तो दोर तोडू शकत नाही. त्यासाठी एखादा मुक्त व्यक्तीच लागतो. “माम एव” याचा अर्थ आहे की ब्रह्मदेव आणि शिवजी सुद्धा कोणाची सुटका करू शकत नाही.कारण तेही रजो आणि तमो गुणाच्या प्रभावात असतात. भगवान शंकर म्हणतात “मुक्तिदाता सर्वेषां विष्णुरेव न संशय“. म्हणून स्वतः इतर खडतर प्रयत्न न करता जेव्हा आपण श्रीकृष्णांना शरण येतो तेव्हा आपण सहज मुक्त होतो.